दहावीतील गुणांचा फुगवटा धोकादायक
दहावीतील गुणांचा फुगवटा धोकादायक! दै. देशोन्नती संपादकीय प्रकाशित दि. १०.०८.२०२० शिक्षण क्षेत्रासाठी मागील आठवडा दोन घटनांनी महत्त्वपूर्ण ठरला. गेल्या तीस वर्षानंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि राज्यात माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला. यंदाच्या दहावीच्या निकालाचे आकडे बघून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले गेले असतील. हा निकाल पाहून खडतर परिश्रम आणि अभ्यासाने ही मुले हुशार झाली की बोर्डाने हुशार बनवून टाकली? हा प्रश्न उपस्थित होतो. यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन राज्याच्या निकालाची टक्केवारी ९५.३० टक्क्यावर जाऊन पोहोचली आहे. १९७५ साली राज्यात प्रथमच १०+२ या सूत्रानुसार दहावीची परीक्षा घेण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच गेल्या पंचेचाळीस वर्षातल्या सर्वोच्च निकालाची नोंद या वर्षीच्या निकालाने केली आ...