दहावीतील गुणांचा फुगवटा धोकादायक
दहावीतील गुणांचा फुगवटा धोकादायक!
दै. देशोन्नती संपादकीय प्रकाशित दि. १०.०८.२०२०
यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन राज्याच्या निकालाची टक्केवारी ९५.३० टक्क्यावर जाऊन पोहोचली आहे. १९७५ साली राज्यात प्रथमच १०+२ या सूत्रानुसार दहावीची परीक्षा घेण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच गेल्या पंचेचाळीस वर्षातल्या सर्वोच्च निकालाची नोंद या वर्षीच्या निकालाने केली आहे. २००२ साली दहावीचा निकाल पहिल्यांदा साठ टक्क्यांच्या पुढे गेला होता तर आतापर्यंतच्या सर्वाधिक निकालाची नोंद २०१५ साली झाली होती. त्यावर्षी ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर मागील वर्षी ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षीच्या निकालाने मागील सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. हा विक्रम केवळ एकूण उत्तीर्णांच्या बाबतीतच घडला असे नाही तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक निकालांतसुद्धा अनेक वेगवेगळ्या विक्रमांची नोंद या निकालाने केली आहे. मागील वर्षी राज्यात २० विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले होते; त्यात यावर्षी चक्क बारा पटीने वाढ होऊन २४२ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळवले आहेत. मागील वर्षी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ५१६ इतकी होती. या वर्षात त्यात तिपटीने वाढ होत ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. या गुणवंतांच्या संख्येत जवळपास ५५ हजारांची वाढ झालेली दिसून येत आहे. कोरोना साथीमुळे भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने या विषयात दिलेल्या सरासरी गुणांमुळे समाजशास्त्र या विषयात राज्यात एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला नाही हा ही एक विक्रमच म्हणावा लागेल. अशा वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करत यावर्षीचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
लागलेल्या निकालाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत गुणात्मक वाढ झाली असती तर ती आनंदाची बाब ठरली असती. परंतु आपल्या शिक्षण पद्धतीत एकाच वर्षात असा कोणता बदल झाला की मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुणवंतांच्या संख्येत एवढी प्रचंड वाढ झाली आहे? गेल्या काही वर्षातील दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व बारावीनंतर होणाऱ्या वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसारख्या (NEET-JEE) इतर स्पर्धात्मक परीक्षांमधील यशस्वी होणाऱ्या विद्यार्थी संख्येतील तफावत बघता हा केवळ संख्यात्मक फुगवटा असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(CBSE), आयसीएसई व राज्यांतील शिक्षण मंडळ यांच्यात विद्यार्थ्यांना गुणांची खैरात वाटण्याची तीव्र स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. दहावीतील गुणांच्या आधारावर जिथे प्रवेश मिळतो तिथे आपले विद्यार्थी मागे राहू नयेत या उद्देशाने ही शिक्षण मंडळे गुणांची खैरात करीत आहेत. वास्तविक विद्यार्थ्यांच्या दर्जात गुणात्मक वाढ करण्यासाठी ही स्पर्धा असायला हवी; परंतु केवळ संख्यात्मक वाढ करून गुणवत्तेचा आभास निर्माण करणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्रातील शिक्षण मंडळांने गेल्या काही वर्षापासून बेस्ट ऑफ फाईव्ह, अंतर्गत परीक्षाचे गुण आदी उपाय योजून विद्यार्थ्यांच्या गुणात भरमसाठ वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच दहावीतील कृतीपत्रिकांचे स्वरुप लक्षात घेता त्यातील प्रश्नांची काठिण्य पातळी अतिशय घसरवण्यात आली आहे व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अधिकाधिक भरणा असल्याने मिळणाऱ्या गुणात प्रचंड वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांने विशीष्ट टप्प्यावर कितपत ज्ञान व कौशल्ये आत्मसात केली हे तपासण्यासाठी ठराविक काळानंतर मूल्यमापन करण्यात येते. परीक्षा ही मूल्यमापनाचे एक साधन असते. परीक्षेतून मिळणाऱ्या या गुणांच्या आधारे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कुठपर्यंत आहे हे लक्षात येत असते. पण आपल्याकडे परीक्षेतील गुण हेच अंतिम यश मानले जात असल्याने परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. गुणांच्या हव्यासापायी हे मूल्यमापन वस्तुनिष्ठ झाले नाही तर विद्यार्थ्यांची व पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जातो. कला, वाणिज्य की विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा हा महत्वाचा निर्णय विद्यार्थी या टप्प्यावर घेत असतो. त्यामुळे या टप्प्यावर मूल्यमापन हे वस्तुनिष्ठच व्हायला हवे. फुगलेल्या गुणांमुळे पालकांच्या अपेक्षा वाढत जातात व त्या भरवशावर पालक महागडे खाजगी क्लासेस, नामांकित शिक्षण संस्थांमधून लाखो रुपये भरून प्रवेश घेतात. यात क्लासेस वाल्यांचा फायदा होत असला तरी पालकांची प्रचंड लूट होऊन दहावीतील गुण आभासी असले तर बारावीनंतर हा फुगा फुटून विद्यार्थी व पालकांचा भ्रमनिरास होतो.
परीक्षेत मिळालेल्या चांगल्या गुणांनीच माणूस जीवनात यशस्वी होतो असे नाही; तर आजपर्यंत अनेक यशस्वी झालेल्या व्यक्तींनी अपयशातून धडा घेऊनच यशोशिखर गाठलेले आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मुलांना अपयशी होऊच द्यायचे नाही हे धोरण चुकीचे आहे. जाहीर झालेला निकाल हा सरसगट गुणांचा फुगवटा आहे, असे म्हणणे हे प्रामाणिकपणे अभ्यास करून यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे होईल. उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी संघर्ष करत अपार कष्ट व मेहनतीने हे यश खेचून आणले आहे; ते सर्व कौतुकास पात्र आहेतच. या सर्वांनी दहावीत मिळालेल्या गुणांनी हुरळून न जाता आगामी काळात कष्टपूर्वक अभ्यास करून यश संपादन करायला हवे!
लेखन --
जगन सर्जेराव बुरकुल
देऊळगाव राजा जि. बुलडाणा
मो. नं. 9403047334
Comments
Post a Comment