दै.देशोन्नती दि.३०जुलै २०२० कोरोना काळातील शिक्षणात पालकांची भूमिका!

कोरोनाकाळातील शिक्षणात पालकांची भूमिका! 

कोरोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीने राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. शालेय शिक्षण विभाग परिपत्रकांवर परिपत्रकांचा भडीमार करुन ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. ऑनलाइन शिक्षणाची ही संकल्पना शहरी भागातून थोड्याफार प्रमाणात उपयोगी पडत आहे. संपूर्ण ग्रामीण भागाबरोबरच शहरातील बऱ्याचशा भागात मात्र आवश्यक साहित्य व सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे शिक्षणाची गंगा पुनःश्च प्रवाहित करण्यात ऑनलाइन शिक्षणप्रणाली यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. मुलांचे शिक्षणचक्र पूर्णपणे थांबल्याने पालकवर्ग आपल्या पाल्यांच्या भवितव्याने चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. केवळ चिंता केल्याने हा प्रश्न सुटणारा नाही हे पालकांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थी-पालक या शैक्षणिक त्रिकोणातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या पाल्यांच्या शिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी पालकांनी आपल्या भूमिकेत थोडासा बदल करून पालकाबरोबरच शिक्षकाची भूमिका स्वीकारल्यास आपल्या पाल्याचे शिक्षण पुन्हा सुरू होण्यास मदत होऊ शकते.यासाठी  पालकांनी आपल्या पाल्यांसाठी दिवसातून किमान अर्धा ते एक तास वेळ राखून ठेवणे गरजेचे आहे.
           मुलांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पाठ्यपुस्तके ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आज शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत; तरी सुदैवाने प्राथमिक स्तरावरील बहुतांश विद्यार्थ्यांना शाळांमधून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश पालकांना लिहिता-वाचता येत असल्याने याच पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन पालकवर्ग आपल्या पाल्यांच्या शिक्षणाला गती देऊ शकतात. त्यासाठी गरज आहे ती पालक व विद्यार्थी यांच्या सकारात्मक प्रयत्नांची. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा  (NCF-2005), व शिक्षण हक्क कायदा-२००९ (RTE-Act 2009) नंतर शिक्षण क्षेत्रात ज्ञानरचनावाद ही संकल्पना मूळ धरू लागली. त्यानंतर प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा - २०१० नुसार प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला. या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांतील पूर्वीचा क्लिष्टपणा घालवून आताची पाठ्यपुस्तके ही बाल मानसशास्त्राच्यादृष्टीने बालस्नेही, कृतीयुक्त व आनंददायी बनवण्यात आली आहेत. या पुस्तकांमध्ये गाणी-गोष्टी, संवाद, कृती, नाट्यीकरण, आकर्षक व सुबक चित्रे, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आदींचा समावेश करून त्या - त्या  वयोगटातील मुलांना सहज आकलन होईल या दृष्टीने आशयाची रचना करण्यात आलेली आहे. पुस्तके बालस्नेही असल्याने त्यातील संकल्पना मुलांना सहज समजू शकतात. याबरोबरच मुले वाचत असताना पालकांनीही आशय लक्षात घेऊन आपल्याला जमेल त्या प्रमाणात शिक्षकाची जागा भरून काढण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकातील धडे पालकांनी मुलांकडून स्वत: वाचून घेऊन त्याचा अर्थ दोघांनी मिळून लावण्याचा प्रयत्न करावा. ज्या संकल्पना मुलांना स्पष्ट होणार नाहीत त्याठिकाणी पालकांनी तो भाग मुलांना समजून घ्यायला मदत करावी. काही संकल्पना पालकांनाही स्पष्ट होत नसल्यास अशा ठिकाणी शेजारील एखाद्या उच्च शिक्षित तरुण किंवा तरुणींचीही मदत घेता येणे शक्य आहे. तसेच शिक्षकांशी संपर्क ठेवून त्यांचेही मार्गदर्शन घेता येऊ शकते. पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पाठानंतर स्वाध्याय व वर्गकार्य दिलेले आहेत. हे स्वाध्याय मुलांकडून सोडवून घेतल्यास त्यांना पाठांचे चांगल्याप्रकारे आकलन होऊ शकते. तसेच सोडवलेल्या उत्तरांवरुन  मुलांना पाठाचे व्यवस्थित आकलन झाले की नाही हे देखील कळू शकते. या पाठ्यपुस्तकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठांमध्ये क्यूआर कोड (QR-Code) देण्यात आलेले आहेत. ज्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत ते पालक हे क्यूआर कोड स्कॅन करून मुलांना त्या पाठासंबंधित व्हिडिओ दाखवू शकतात. यातून मुलांना संबंधित घटकाचे आकलन सहज शक्य आहे. त्याबरोबरच प्रत्येक पाठात शिक्षकांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचना पालकांनी वाचून तशा प्रकारची कृती मुलांकडून करून घेतल्यास पालक आपोआपच शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहे. या पुस्तकांच्या सुरुवातीलाच अध्ययन निष्पत्ती व संबंधित अध्ययन निष्पत्ती पूर्ण होण्यासाठी कोणता आशय उपयुक्त आहे याची यादी जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्या घटकातून मुलाला काय येणे अपेक्षित आहे व त्यासाठी कोणती कृती किंवा उपक्रम घेणे आवश्यक आहे हे देखील पालकांच्या चटकन लक्षात येऊ शकेल.  
      मुलांचे शिक्षण केवळ चार भिंतीच्या आतील शाळेत किंवा पुस्तकातील बंदिस्त ज्ञानातूनच होऊ शकते असेही नाही; तर मुल परिसरात, कुटुंबात, समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे सतत निरीक्षण करत असते. या घटनांचा जमेल तसा अर्थ लावून ते शिकत असते. त्यामुळे पालकांनी मुलांना परिसरातील घटना वस्तू, प्राणी, वनस्पती आदींची जमेल तेवढी माहिती देऊन त्यांच्या ज्ञानात भर टाकायला हवी. मुले ही मुळातच सृजनशील असतात त्यांना शिकविण्याची फारशी गरज नसतेच; गरज असते ती फक्त त्यांना स्वतः अभ्यास करण्यासाठी प्रेरित करण्याची.
         वास्तविक शिक्षण म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया असते. मूल शिक्षकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जे शिकू शकते ते या पद्धतीने शक्य होणार नाही; परंतु भविष्यात जेव्हा शाळा सुरू होतील तोपर्यंत या पद्धतीने विद्यार्थ्यांचा बराचसा अभ्यास पूर्ण झालेला असेल व उरलेला अभ्यास शिक्षक निश्चितच पूर्ण करून घेतील. या प्रकारच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागल्यामुळे ते पुढे आयुष्यभर आत्मविश्वासानेे प्रगती करत राहतील. शिक्षण प्रक्रियेत सातत्य, सराव, उजळणी आदी गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे या संकटकाळात मुलांचे शिक्षण अखंडितपणे चालू राहण्यासाठी शाळा, शिक्षक, प्रशासन व पालक या संबंध यंत्रणेने आपापल्या परीने शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे. मानवी विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिक्षणाचे हे चक्र थांबता कामा नये; कारण काळाचे चक्र कोणत्याही संकटात कुणासाठीच कधीही थांबत नाही!

लेखन --
जगन सर्जेराव बुरकुल, जि.प. शिक्षक
देऊळगाव राजा जि. बुलडाणा
मो. नं. : 9403047334



Comments